दिव्या भिमराज राजुरकर, प्रमोद मुनघाटे आणि शैलेन्द्र धर्मदास लेंडे
Published in Vol.16, 2026
KEYWORDS: नैतिकता, बाजारपेठ, माणूसपण, मध्यमवर्ग, ‘संप्रति’, उदारीकरण, नंदा खरे
ABSTRACT:
मराठी साहित्याच्या विशाल परंपरेत प्रत्येक युगाला काही असे लेखक लाभतात, जे केवळ शब्दांचे कारागीर न राहता, ते एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे समाजाला दिशा देतात. नंदा खरे म्हणजेच अनंत यशवंत खरे हे सृष्टी, मानवी जीवन आणि सांस्कृतिक परिवर्तन यावर लेखन करणारे मराठी भाषेतील एक ज्येष्ठ लेखक व कादंबरीकर होते. त्यांच्या लेखनामध्ये समाजशास्त्रीय, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि भुशास्त्रीय विषयांना मध्यवर्ती स्थान त्यांनी दिले होते. त्यांची ओळख केवळ एका कादंबरीकाराची नव्हती, तर ते एक विचारवंत, विज्ञाननिष्ठ, समाजसजग आणि मानवतावादी लेखक होते, ज्यांनी आपल्या लेखणीतून मराठी साहित्याला एक वेगळी दिशा दिली.
नंदा खरे यांची ‘संप्रति’ ही कादंबरी (१९९८) मराठी साहित्यातील एक असाधारण कृती आहे. ती बाजारपेठेच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर माणूसपणाचा शोध घेते. उदारीकरणानंतर भारतात ‘पैसाच सर्वस्व’ ही विचारसरणी समाजाच्या कानाकोपऱ्यात रुजत असताना सुधाकर पानसे हे पात्र ‘चांगुलपणाचा हट्ट’ धरून उभे राहते. हा संशोधन लेख ‘संप्रति’तील नैतिकतेचा विमर्श करतो. बाजारपेठ आणि माणूसपण यांच्यातील द्वंद्वाचे स्वरूप, मुख्य प्रसंगांतून उभे राहणारे नैतिक प्रश्न, पात्रांची वैचारिक भूमिका, आणि कादंबरीची मराठी साहित्यातील सार्वकालिक प्रासंगिकता या सर्व आयामांवर प्रकाश टाकते. मराठी व पाश्चात्य समीक्षाग्रंथांच्या आधारे हे विश्लेषण जागतिक साहित्यिक परिप्रेक्ष्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
